Monday, August 24, 2009

गर्विष्ठ की अभिमानी ??

आपण सर्वांनीच नितांतसुंदर असा "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" बघितला असेलच. तो किती अप्रतिम आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही किंवा त्याची उत्कृष्टता जोखण्याएवढी माझी कुवतही नाही. फ़क्त त्यातला एक खटकलेला मुद्दा मांडावासा वाटला जो (माझ्या मते) अतिशय महत्वाचा आहे आणि तो विषयाच्या हेतुच्या आड़ येणारा ठरू शकतो किंवा मराठीत चुकीच्या शब्दांचा पायंडा पाडणारा ठरू शकतो म्हणुनच हा ब्लॉग प्रपंच.

या चित्रपटाची टॅगलाईन आहे "गर्व आहे मला महाराष्ट्रीय असल्याचा". माझ्या मते दिग्दर्शकाला "गर्व" च्या जागी "अभिमान" हा शब्द अभिप्रेत असावा किंबहुना "अभिमान" हा शब्दच तेथे जास्त समर्पक आहे परंतु हिंदी भाषेच्या अतिरेकामुळे (किंवा पगडा म्हणा हवं तर) हा चुकीचा शब्दा प्रयोग कोणाच्याच लक्षात आलेला नाही. कारण हिंदीत "मुझे गर्व है की मैं आपका बेटा हूं" किंवा "मुझे अपने भारतवासी होनेपे गर्व है" असे शब्दप्रयोग वापरले जातात कारण त्या भाषेतील त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे ते योग्यही आहे.

असं म्हणतात की कुठलीही भाषा जितकी जास्तीत जास्त वापरली जाते तितके तिच्यातील शब्दालंकार, तिचे आयुष्या वृध्दिंगत होत जाते. गुरुमुखी (किंवा पंजाबी) भाषा ही काही वर्षांपूर्वी मृतवत होऊ घातली होती परंतु त्या भाषिकांनी प्रयत्नपूर्वक अंगिकारलेल्या प्रयत्नांमुळे आज ती भाषा भारतातील अनेल हिंदी भाषिक राज्यांमधे संवाद साधण्याची एक प्रभावी भाषा बनली आहे। (आणि याउप्पर तिला बॉलीवुड च्या चित्रपटांमधे जवळपास राष्ट्रीय भाषेचा दर्जा ही मिळाला आहेच हे सांगणे न लगे). इथे मला मराठी भाषेच्या वापराच्या नावाने गळे काढायची इच्छा नाही. परंतु त्यामुळे वस्तुस्थितीत बदल होत नाही हे मात्र नक्की.

आपल्याला लहानपणा पासून शिकवण्यात आलेल्या "गर्वाचे घर खाली" किंवा "ग ची बाधा" अशा म्हणी किंवा शब्दप्रयोगांवरून गर्व हा शब्द गुणांच्या कक्षेत न येता त्याकडे अवगुण म्हणूनच पहिले जाते हे नक्की. (परंतु हिंदीत गर्व हे अभिमान या अर्थी आणि अभिमान हे गर्व या अर्थी वापरले जाते म्हणून आपणही मराठीतले अर्थ सोडून हिंदी अर्थ उसनवार घेण्याची गरज नाही.. आठवा अमिताभ आणि जया चा "अभिमान".... असो).

प्राथमिक शिक्षण झालेल्या कुठल्याही व्यक्तीच्या हे खरतर चटकन ध्यानात यायला हवं होतं. क्षणभरासाठी आपण हे विसरू की सामान्य माणसाच्या हे लक्षात आले नाही परंतु इतके साहित्यिक, लेखक, मराठी कथा/पटकथा लेखक इत्यादी कोणाच्याच हे लक्षात आल नाही हे खर तर मोठ्ठं आश्चर्य म्हटलं पाहिजे. किंबहुना चित्रपटाचा निर्माता, पटकथाकार हा महेश मांजरेकर सारखा प्रथितयश मराठी कलाकार असून ही त्याच्याही ही गोष्ट लक्षात आली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. कालांतराने पुढल्या पिढीने "गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा" आणि "गर्वाचे घर खाली" याच्या संधितून "त्यामुळेच महाराष्ट्रीय माणूस खाली असतो" असा निराळाच अर्थ काढला तर आश्चर्य वाटायला नको...

3 comments:

 1. धन्यवाद पल्लवी.. !

  ReplyDelete
 2. Putting same comment as I did for Ganesh's FB post :)
  काल 'Mifta awards' चा भव्य दिव्य(!) सोहळा दाखवत होते. इथे सुद्धा अभिमान च्या ऐवजी 'गर्व' हा शब्द जाणीवपूर्वक वापरत होते; जे काही प्रहसन चालू होते त्यात.
  किंबहुना एका पात्राने 'अभिमान' असे म्हटल्यावर, "अरे, नुसता अभिमान नाही 'गर्व' म्हण!" असे सांगितले आणि पुढे पूर्ण कार्यक्रमभर 'गर्वा'चेच घर होते :)
  ह्या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा कोण आहे हे बघितल्यावर सगळी संगती लागते :P

  ReplyDelete